May 16, 2021

𝑪𝒐𝒗𝒂𝒙𝒊𝒏 की 𝑪𝒐𝒗𝒊𝒔𝒉𝒊𝒆𝒍𝒅?

*𝑪𝒐𝒗𝒂𝒙𝒊𝒏 की 𝑪𝒐𝒗𝒊𝒔𝒉𝒊𝒆𝒍𝒅?* 

आजकालचा हा एक हॉट टॉपिक आहे डिस्कशनचा. आता त्यात स्पुटनिकपण आलंय.

अनेक जण आज डॉक्टर झाल्यासारखे त्या विषयावर रिसर्च करताहेत आणि आपले फाइंडींग्ज व्हॉट्सॲप यूनिवर्सिटी मध्ये शेअर करताहेत. आणि या सगळ्यासाठी मुख्य कल्प्रीट आहेत मीडियावाले, जे काहीतरी अर्धवट माहिती ट्विस्ट करून, मसाला लाऊन आणि न्यूज बनवून पब्लिश करतात. त्यासाठीच हा लेखन प्रपंच.

आम्ही नुकतंच रिलायन्स मध्ये व्हॅक्सिन घेतलं. त्यानंतर तीन प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या. 

एक - काहींना मनापासून छान वाटलं.

दोन - काहींना वाईट पण वाटलं की यांना सहजपणे मिळालं, आपल्याला त्रास होतोय आणि रिलायन्स काहीतरी अनैतिक करते आहे. त्यांना समजवावं लागलं की रिलायन्स आज देशासाठी अनेक गोष्टी करते आहे. आज देशाच्या रोजच्या ऑक्सिजनच्या मागणीपैकी ११ टक्के गरज रिलायन्स पूर्ण करते आहे. ते पण फ्री ऑफ कॉस्ट. मुंबईत आठशे सुसज्ज बेड्स रिलायन्सने गंभीर रुग्णांसाठी निःशुल्क उपलब्ध करून दिले आहेत. हे सर्व अनेक महिन्यांपासून सुरू आहे. लावा पर डे बेड प्रमाणे हिशोब. इतरही अनेक गोष्टी केलेल्या आहेत, ज्या इथे लिहिणे म्हणजे मूळ पोस्टचा विषय दूर राहील. अनेक लोकं असे आहेत की रिलायन्सनी काहीही केलं तरी नावंच ठेवतात. त्यांनी हा विचार करावा की या लढ्यात अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांचं कुठे नावही का नाही? तेच लोकं टाटांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीची तारीफच करतात. आता असं झालंय की टाटा म्हणजे देशभक्त आणि रिलायन्स म्हणजे पैसे ओरबाडणारे. असं वाटणार्‍यांनी इतिहासात काही दशके मागे जाऊन पहावे. तेव्हा टाटा, बिर्ला यांना भांडवलदार आणि देशाचा पैसा ओरबाडून काढणारे म्हणुनच पाहिलं जात होतं. टाटा एअरलाईन्सची एअर इंडिया का झाली हे पण तपासा. असो. तर इतकं सगळं देशासाठी करणारी रिलायन्स आपल्या एम्प्लॉईजला व्हॅक्सिन पण देणार नाही का? ते पण सरकारनी फेज ३ मध्ये खाजगी कंपन्यांना प्रोक्युअरमेंटसाठी परवानगी दिली असताना?

तीन - काहींनी यातच समाधान मानलं की चला, यांना कमीतकमी 𝑪𝒐𝒗𝒂𝒙𝒊𝒏 तरी नाही मिळालं, जे आपण शोधतोय.

रिलायन्समध्ये सहजपणे 𝑪𝒐𝒗𝒊𝒔𝒉𝒊𝒆𝒍𝒅 मिळत असतानाही आम्हाला 𝑪𝒐𝒗𝒂𝒙𝒊𝒏 च हवं म्हणुन व्हॅक्सिन न घेणारे एम्प्लॉईज पण आहेतच.

जेव्हा सरकारने या दोन्ही व्हॅक्सिन्सला परवानगी दिली तेव्हा 𝑪𝒐𝒗𝒂𝒙𝒊𝒏 कोणी घेत नव्हतं. आजही नागपूरात 2nd डोस साठी 𝑪𝒐𝒗𝒂𝒙𝒊𝒏 जे फक्त GMC ला मिळतात आहेत, ते 1st फेज मध्ये डॉक्टर लोकांसाठी आलेल्या लॉट मधले आहेत, जे उरले होते कारण त्यांनी तेव्हा 𝑪𝒐𝒗𝒊𝒔𝒉𝒊𝒆𝒍𝒅 प्रेफर केलं होतं. नंतर अचानक मीडिया मध्ये बातमी आली की 𝑪𝒐𝒗𝒂𝒙𝒊𝒏 नवीन स्ट्रेन आणि डबल म्यूटेटेड व्हायरसवरसुद्धा काम करतं. एक भारतीय म्हणुन मला या गोष्टीचा आनंदच आहे. पण त्या मीडिया रिपोर्ट्स मध्ये हे कुठेही दिलेलं नाही की त्यावर 𝑪𝒐𝒗𝒊𝒔𝒉𝒊𝒆𝒍𝒅 काम करत नाही.

अनेक डॉक्टर्स जे माझ्या संपर्कात आहेत ते सर्व हेच सांगताहेत की तुम्ही 𝑪𝒐𝒗𝒊𝒔𝒉𝒊𝒆𝒍𝒅 की 𝑪𝒐𝒗𝒂𝒙𝒊𝒏 या भानगडीत पडू नका. जे मिळतंय ते ताबडतोब घ्या. फायजर, मॉडर्ना, स्पुटनिक किंवा जगातलं कोणतंही व्हॅक्सिन तुम्हाला १०० टक्के संरक्षण देत नाही, देणार नाही. सर्वच एक्सपर्ट्स हेच सांगताहेत की व्हॅक्सिन घेऊनही तुम्हाला कोरोना होऊ शकतो. मात्र व्हॅक्सिन घेतल्यावर त्याची तीव्रता निश्चित कमी होते, आणि शक्यतोवर तुम्हाला अ‍ॅडमिट व्हायची गरज पडणार नाही. 

तर मित्रांनो, आज वेळ अशी आहे, की जे मिळत असेल ते व्हॅक्सिन घ्या, पण शक्य तितक्या लवकर घ्या. जास्त चांगलं व्हॅक्सिन घेण्यासाठी वाट पाहण्याच्या फायद्यांपेक्षा, हवं ते व्हॅक्सिन मिळवण्याच्या चक्कर मध्ये उशीर करण्याचे धोके कित्येक पटीने जास्त आहेत.

पुन्हा सांगतोय की 𝑪𝒐𝒗𝒊𝒔𝒉𝒊𝒆𝒍𝒅 मुळे ब्लड क्लॉटिंग होतं वगैरे भानगडीत पडून डॉक्टर बनू नका. त्या केसेस अतिशय नगण्य आहेत. ICMR आणि सरकारवर विश्वास ठेवा. तसं काही असतं तर परवानगीच दिली नसती, किंवा दिल्यावर वापस घेतली असती. आणि अशा केसेस व्हॅक्सिन न घेता सुद्धा आढळतात. तितकी रिस्क प्रत्येक व्हॅक्सिन, किंवा प्रत्येक औषधातसुद्धा असते. यूरोप मधल्या काही छोट्या देशांमध्ये काही केसेस आढळल्या आहेत. तरीही इंग्लंड मध्ये मोठ्या प्रमाणात ही ऑक्सफर्डची लस दिल्या गेली आहे आणि आज इंग्लंड बर्‍यापैकी कोरोना मुक्त आहे. बाकी व्हॅक्सिन घेतल्यानंतरचे ताप, डोकेदुखी, अंग दुखणे वगैरे हलकेफुलके साईड इफेक्ट्स दोन्ही व्हॅक्सिन्स मध्ये आहेत, आणि ते असायला सुद्धा हवेत. ते आहेत याचा अर्थ तुमच्या शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होतेय. 

असंही नाहीये की कोरोनावर हे पहिलं आणि शेवटचं व्हॅक्सिन आहे जे तुम्हाला घ्यायचं आहे. या सर्वच व्हॅक्सिन्सला जगातल्या सार्‍याच देशांनी फक्त Emergency approval दिलेलं आहे. पुढे जसाजसा अजून रिसर्च होईल तसेतसे व्हॅक्सिन्स येत जातील आणि आपल्याला घ्यावे लागतील. स्वाइन फ्लू येऊन एक दशक झालं. अजुनही त्याचं व्हॅक्सिन दरवर्षी वेगळं घ्यावं लागतं, कारण विषाणू स्वतःला बदलत जातात. कम्प्युटर व्हायरस साठी अ‍ॅण्टी व्हायरस जशा व्हायरस डेफिनेशन्स अपडेट करतो तसाच प्रकार आहे हा.

आणि एक विचार करा आणि प्रामाणिकपणे उत्तर द्या. आपण आपल्या मुलांना अनेक प्रकारचे व्हॅक्सिन्स दिलेले आहेत. आपण कधीतरी त्यात डोकं लावलं आहे का? कोणत्या रोगावर, कोणत्या प्रकारचं, कोणत्या ब्रँडचं व्हॅक्सिन द्यायचं आणि त्याचे किती डोस द्यायचे, हे सर्व आपले डॉक्टर ठरवतात. मग आता का इतका विचार करायचा?

त्यामुळे एव्हढीच कळकळीची विनंती आहे की जास्त डोकं लावत बसू नका. जे व्हॅक्सिन लवकरात लवकर मिळेल ते घ्या.

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...