आज सकाळी तीन छोटे मुलं आमच्या गच्चीकडे बघत समोरच्या रस्त्यावर उभे होते. गरीबच होते. मी दिसताच एक धिटाईने पुढे आला आणि म्हणाला "काकाजी (म्हणजे मी 😁) गच्चीवर पतंग आहे. घेऊ द्या ना जी". दोन मजले चढून गच्चीवरून पतंग आणून देणं थोडं जिवावरच आलं होतं. मी त्यांना नाही म्हटलं. अर्जुन घरी नसुन पण त्याला सांगितलं की माझा मुलगा गच्चीत आहे आणि पतंग तोच घेईल. तरी तो पुन्हा म्हणाला "द्या ना जी". मी नेहमी प्रमाणे थोडं हाडहूड करून त्यांना पळवुन लावलं. तरी ते मुलं पाच मिनिटे रस्त्यावरच घुटमळत होते. त्यांची ती अजीजी अस्वस्थ करणारी होती. गच्चीवर जाऊन पतंग खाली घेऊन आलो आणि बाहेर जाऊन त्यांना आवाज दिला. मग तिघांचं आपसात "मला द्या, मला द्या" सुरू झालं. त्यांना म्हटलं की ज्यानी मागितली होती त्यालाच मिळेल. त्याला पतंग दिली आणि घरी आलो. अर्ध्या तासानी पाहतो तर तीच एक पतंग हातात धरून ते समोरच्या मैदानात फिरत होते. "उडवत का नाहीये रे" विचारलं तर म्हणाले की मांजा नाही आहे. एखादी पतंग ढील वर कटून आली तर उडवू.
मी घरी नेहमी मुलांना म्हणत असतो की तुमच्या साठी सर्व मजा पण विकत घ्यावी लागते. फुकटातली किंवा स्वस्तातली मजा कशी असते ते तुम्हाला माहितीच नाही. मला एकदम वाटलं ही स्वस्तातली मजा पण हे मुलं घेऊ शकत नाही आहेत. कदाचित ही गोष्ट आपल्यासाठी स्वस्त आहे पण त्यांचे आईवडील त्यांना नसतील घेऊन देऊ शकत. त्या बिचाऱ्यांसाठी ही गोष्ट पण महाग असेल. मी एकटाच जवळच्या पतंगीच्या दुकानात गेलो. पाच पतंगी, एक चक्री आणि एक मोठं साध्या सद्दीचं (सद्दी म्हणजे साधा पण पक्का दोरा, मांजा नव्हे) बंडल हे सर्व मिळून दीडशे रुपयात घेऊन आलो. वापस येई पर्यंत त्याचे दोन मित्र कंटाळून घरी गेले होते. हा पोरगा तोच ज्यानी आधी मला पतंग मागितली होती. त्याला पाच पतंगी आणि सद्दीचं बंडल दिलं. 'सोहम' सोबत त्याचा फोटो काढला. मनातून खूष होता पण संकोचामुळे थोडा अवघडल्या सारखा झाला होता. त्याला म्हटलं की घरून दोन मित्रांना पण घेऊन ये आणि सगळे मिळून पतंग उडवा.
काल मुलांच्या पतंगी, चक्र्या आणि मांजा वर ५०० रुपये खर्च करून पण जितका आनंद झाला नाही तो आनंद मला आज १५० रुपये खर्च करून या मुलाची खुषी पाहून झाला.
आता मी ब्लॉग लिहितोय आणि समोरच्याच मैदानात ते पतंग उडवतात आहेत. ते आणि मी दोघंही खूष आहोत. तरी पण ते माझ्यापेक्षा जास्तच खूष दिसतात आहेत. तरी आपल्याला आपलं एक थोडं समाधान...ते पण विकत घेतलेलं...