Dec 11, 2018

बोलतांना अक्षर बदलले जाणे - व्याकरणाची मदत

आजपर्यंत मला काही लोक असे भेटले आहेत जे बोलतांना नकळतपणे एखाद्या अक्षराला दुसऱ्या अक्षरानी Replace करतात आणि त्यामुळे कधीकधी शब्दाचा अर्थसुद्धा बदलतो. त्या काहींमध्ये आधी आमचा मोठा मुलगा अर्जुन पण होता. त्याबद्दल नंतर सांगतो. 

आज ऑफिसमध्ये एका मिटिंग मध्ये एक माणूस "बॅग" ऐवजी "बॅफ" म्हणाला. मला आधी तो शब्दच कळला नाही. पण नंतर अजून एक दोनदा त्यांनी "ग" ऐवजी "फ" म्हटलं तेव्हा उलगडा झाला आणि अर्जुन आठवला. अजून एक व्यक्ती माझ्या चांगल्या ओळखीची होती जी "क" ऐवजी "त" म्हणायची. "ऐसा कर" ऐवजी "ऐसा तर" असं म्हणायची. अर्जुन लहान होता म्हणून गम्मत वाटायची पण मोठेपणी कोणी असं बोललं की प्रत्येकाला हसू लपवावं लागतं. खरं म्हणजे हसू येणं चूक आहे पण स्वाभाविक सुद्धा आहे. असं बोलण्याला तोतरं बोलणं (stammering) पण म्हणू शकत नाही कारण ते बाकी स्पष्ट बोलतात. 

अर्जुनला सुद्धा अशीच सवय होती लहान असतांना. तो दोन वर्षाचा झाल्यापासून पूर्ण बोलू लागला होता. गोष्टीच्या गोष्टी सांगायचा. पण जिथे "क" येईल तिथे "च" म्हणायचा. म्हणजे "कोकिळा" ऐवजी "चोचीळा", "कचोरी" ऐवजी "चचोरी". त्याचं बोलणं समजून घ्यायचं असेल तर तो काय बोलतोय ते ऐकायचं, मनात "CTRL+H" कमांड द्यायची, "Find what" मध्ये "च " लिहायचं  आणि "Replace with" मध्ये "क" लिहायचं इतकं परफेक्ट असायचं  त्याचं ते रिप्लेसमेंट. असं जवळजवळ तीन वर्ष म्हणजे तो पाच वर्षाचा होईपर्यंत चाललं. लहान होता म्हणून गंमत वाटायची पण मोठेपणी असाच बोलेल का ही धास्ती सुद्धा होतीच मनात कुठेतरी. आम्ही त्याला अनेक वेळा शिकवायचा प्रयत्न केला पण पालथ्या घड्यावर पाणी. त्याला सुद्धा तो असा बोलतोय हे कळायचं पण तरी बोलतांना तसंच बोलल्या जायचं. कारण "क" कसं बोलावं ते त्याला कळत नव्हतं.  

हा प्रॉब्लेम अचानक अगदी काही मिनिटात कायमचा सॉल्व्ह झाला. 

एके दिवशी रात्री आम्ही मस्ती करत होतो. अर्जुन नेहमीप्रमाणे "च" म्हणाला. कशी कोणास ठाऊक पण मला लहानपणी व्याकरणात शिकलेली वर्णमाला आठवली आणि कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, दंत्य, ओष्ठय वर्ण आठवले. "क" हा कंठ्य वर्ण आहे आणि "च" हा तालव्य वर्ण आहे हे आठवलं. म्हणजे "क" म्हणताना जिभेचा वापर न करता ध्वनी कंठातून येतो म्हणून तो कंठ्य वर्ण आणि "च" म्हणतांना जीभ वर टाळूला लागते म्हणून तो तालव्य वर्ण. हे जसं लक्षात आलं तसं  अर्जुनला "क" म्हणायला लावलं आणि सांगितलं की "क" म्हणतांना जीभ अजिबात हलवू नको. त्यानी एक दोनदा प्रयत्न केला आणि त्याच्या लगेच लक्षात आलं की "क" म्हणतांना काय करावं लागतं आणि "क" चा ध्वनी कसा निघतो. त्या दिवशी नंतर हा प्रॉब्लेम त्याला कधीच आला नाही.  

हे सांगण्याचा उद्देश हा की मराठी, संस्कृत वगैरे भाषांचं व्याकरण किती शास्त्रोक्त आहे हे कळावं आणि अजून कोणाला याचा उपयोग व्हावा.

मराठी वर्णमालेत व्यंजनांमधल्या वर्णांची वर्गवारी खालील प्रमाणे आहे. 


क ख ग घ ङ - कंठ्य म्हणजे कंठातून ध्वनी निघतो
च छ ज झ ञ - तालव्य म्हणजे जीभ टाळूला लागते (यातला ञ म्हणजे Tra -त्र  नव्हे. त्याचा उच्चार यं सारखा आहे)
ट ठ ड ढ ण - मूर्धन्य म्हणजे जीभ मुर्धेला (अजून वर) लागते 
त थ द ध न - दंत्य  म्हणजे जीभ दातांना लागते 
प फ ब भ म - ओष्ठ्य म्हणजे दोन्ही ओठ एकमेकांना लागतात 
(असा मी असामी मध्ये पु.लं. नी "आवली सरोज खरे" म्हणून ओष्ठ्य वर्णांवरून आणि लिपस्टिक वरून विनोद केला आहे)

हसण्यापेक्षा हे व्याकरणाचं शास्त्र समजून घेऊन कोणासाठी ह्याचा उपयोग करता आला तर करावा ही प्रामाणिक सदिच्छा. 

Jan 15, 2017

थोडं समाधान...विकत घेतलेलं...

आज सकाळी तीन छोटे मुलं आमच्या गच्चीकडे बघत समोरच्या रस्त्यावर उभे होते. गरीबच होते. मी दिसताच एक धिटाईने पुढे आला आणि म्हणाला "काकाजी (म्हणजे मी 😁) गच्चीवर पतंग आहे. घेऊ द्या ना जी". दोन मजले चढून गच्चीवरून पतंग आणून देणं थोडं जिवावरच आलं होतं. मी त्यांना नाही म्हटलं. अर्जुन घरी नसुन पण त्याला सांगितलं की माझा मुलगा गच्चीत आहे आणि पतंग तोच घेईल. तरी तो पुन्हा म्हणाला "द्या ना जी". मी नेहमी प्रमाणे थोडं हाडहूड करून त्यांना पळवुन लावलं. तरी ते मुलं पाच मिनिटे रस्त्यावरच घुटमळत होते. त्यांची ती अजीजी अस्वस्थ करणारी होती. गच्चीवर जाऊन पतंग खाली घेऊन आलो आणि बाहेर जाऊन त्यांना आवाज दिला. मग तिघांचं आपसात "मला द्या, मला द्या" सुरू झालं. त्यांना म्हटलं की ज्यानी मागितली होती त्यालाच मिळेल. त्याला पतंग दिली आणि घरी आलो. अर्ध्या तासानी पाहतो तर तीच एक पतंग हातात धरून ते समोरच्या मैदानात फिरत होते. "उडवत का नाहीये रे" विचारलं तर म्हणाले की मांजा नाही आहे. एखादी पतंग ढील वर कटून आली तर उडवू.


मी घरी नेहमी मुलांना म्हणत असतो की तुमच्या साठी सर्व मजा पण विकत घ्यावी लागते. फुकटातली किंवा स्वस्तातली मजा कशी असते ते तुम्हाला माहितीच नाही. मला एकदम वाटलं ही स्वस्तातली मजा पण हे मुलं घेऊ शकत नाही आहेत. कदाचित ही गोष्ट आपल्यासाठी स्वस्त आहे पण त्यांचे आईवडील त्यांना नसतील घेऊन देऊ शकत. त्या बिचाऱ्यांसाठी ही गोष्ट पण महाग असेल. मी एकटाच जवळच्या पतंगीच्या दुकानात गेलो. पाच पतंगी, एक चक्री आणि एक मोठं साध्या सद्दीचं (सद्दी म्हणजे साधा पण पक्का दोरा, मांजा नव्हे) बंडल  हे सर्व मिळून दीडशे रुपयात घेऊन आलो. वापस येई पर्यंत त्याचे दोन मित्र कंटाळून घरी गेले होते. हा पोरगा तोच ज्यानी आधी मला पतंग मागितली होती. त्याला पाच पतंगी आणि सद्दीचं बंडल दिलं. 'सोहम' सोबत त्याचा फोटो काढला. मनातून खूष होता पण संकोचामुळे थोडा अवघडल्या सारखा झाला होता. त्याला म्हटलं की घरून दोन मित्रांना पण घेऊन ये आणि सगळे मिळून पतंग उडवा. 

काल मुलांच्या पतंगी, चक्र्या आणि मांजा वर ५०० रुपये खर्च करून पण जितका आनंद झाला नाही तो आनंद मला आज १५० रुपये खर्च करून या मुलाची खुषी पाहून झाला. 

आता मी ब्लॉग लिहितोय आणि समोरच्याच मैदानात ते पतंग उडवतात आहेत. ते आणि मी दोघंही खूष आहोत. तरी पण ते माझ्यापेक्षा जास्तच खूष दिसतात आहेत. तरी आपल्याला आपलं एक थोडं समाधान...ते पण विकत घेतलेलं... 
Related Posts Plugin for WordPress, Blogger...