Nov 23, 2009

बायको म्हणजे देवाने घडवलेले अप्रतीम यंत्र.....

बायको म्हणजे देवाने घडवलेले अप्रतीम यंत्र...

सकाळच्या गजराबरोबर सेवेस हजर,

पेस्ट आणि ब्रश दिसेल, पहिले जिथे जाईल नजर,

गरम पाणी, श्यांपु, टॉवेल, साबण, असेल सुसज्ज बाथरुम,

अंगातल्या कपड्याबरोबर चहा असेल हजर,

असंच असतं रोज सकाळचं सत्र.


बायको म्हणजे देवाने घडवलेले अप्रतीम यंत्र...

ऑफीसला जातांना गरमागरम डबा, आणि गोड मुका,

संध्याकाळी परत स्वागत, घालून पोटात दिवसभरच्या चुका,

हातातली बॅग टेबलावर जाते, संध्याकाळच्या चहा बरोबर,

'अहो ऐकले का' म्हणून ऐकू येतात गोड गोड हाका,

तिच जाणो तिचे हे अजब तंत्र,

बायको म्हणजे देवाने घडलेले अप्रतीम यंत्र.. ‌


रुचकर जेवणा बरोबर गप्पांची फोडणी असते,

डोळा लागे पर्यंत भांड्याशी तीचे युद्ध सुरुच असते,

सगळ्या घरावर शेवटचा हात मारुन,

पदराला हात पुसत गालात खुदकन हसते,

आणि कानात पुटपुटते प्रेमाचा मंत्र,

बायको म्हणजे देवाने घडलेले अप्रतीम यंत्र..


जेवले का हो.. म्हणून आठवण करून देणारे,

मनातल्या भावना लगेच जाणून घेणारे,

जीवनाच्या वाटेवर ऊन असो वा सावली,

नेहमीच सोबत देणारे, आधार होणारे,

असे आहे बायको नावाचे यंत्र...

बायको म्हणजे ...

बायको म्हणजे ... बायको म्हणजे ... बायको असते
कधी मंद दिव्याची वात, तर कधी पेटलेली मशाल असते ||

ती जेंव्हा घरात असते, माझं तिच्याशी अजिबात पटत नाही,
ती जेंव्हा घरात नसते, मला जरासुद्धा करमत नाही ||
पाणी, धोबी, दुधवाला, पेपरवाला, नाठाळ शेजा-याला
तीच व्यवस्थित हाताळू शकते. ||

घरात कुणाची, कुठली वस्तू कुठे आहे?
बँकबुक, लौकरच्या चाव्या, हातरुमाल कुठे आहे?
कुणाचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस कधी आहे?
सारी नोंद तिच्या मेंदुत पक्की असते ||

आला गेला पै पाहुणा, सर्वांचच ती मनापासुन स्वागत करीत असते
कोण आचरट, कोण हावरट, कोण बावळट, कोण भला
प्रत्येकाची नवी ओळख तीच करुन देत असते ||

मुलाचा अभ्यास, ग्रुहपाठ, पालकसभा, तीच अटेंड करत असते
विविध कर्जे, कशा कशाचे हप्ते, सणवार, लग्नकार्य, देणी-घेणी
अनेक आघाड्यांवर एकाचेवेळी तीच लढत असते ||
सासु-सासरे, आई-वडील, दीर, जाऊ, नणंदा आणि वहिनी
सर्वांबरोबर समभावाने ती वागत असते ||

सर्वांशी गोड बोलुन चांगुलपणा मी घेतो,
नको तिथे, नको तेवढं खरं बोलुन वाईटपणा ती घेत असते ||
वाहन मी चालवत असतो, शेजारी ती बसलेली असते,
घ्या डावीकडे, ग्या उजवीकडे, सतत मला ती सांगत असते ||
म्हैस आली संभाळा, त्या बाईकडे काय बघत बसलात,
टाका गिअर, व्हा पुढे, सतत सुचना देत असते ||

घराच्या दारावर नेमप्लेट माझी असते,
पण घराच्या आत तिचीच अनिर्बंध सत्ता असते ||
तिच्याच इशा-यावर अवघे घरदार नाच असते,
फुटकं माझं नशिब, चांगली स्थळे सोडुन तुमच्या घरी आले,
केवळ मी म्हणुन सोसलं सारं, आजवर इथं टिकुन राहिले,
तुमची काय, माझी काय, प्रत्येकाची बायको हेच म्हणत असते ..!!!

खरं सांगतो मित्रा, बायको म्हणजे , वळलं तर सुत
नाहीतर मानगुटीवर बसलेलं भुत असते..
साहेब काय, कारकुन काय, सगळ्यांची गत तीच असते ||
कुठल्याशा औफिसातल्या कुठल्याशा कोप-यात खर्डेघाशी मी करत असतो
पण आपला नवरा मोठा साहेब आहे असं जगाला सांगुन
ती माझी अब्रू झाकीत असते..||

दोन्ही हातांनी मी माझेच पैसे उधळत असतो
ती मात्र काटेकोरपणे हिशेब सगळा ठेवीत असते ||
महिना अखेरी पेट्रोलसाठी मी जेंव्हा रददी विकायला काढतो,
तेंव्हा शंभराची नोट हळुच ती माझ्या हातावर ठेवीत असते..||

वरवर राग असला तरी मनात तिच्या
रातराणीसारखी दडलेली एक प्रित असते
मी जेंव्हा कविता रचत असतो, तेंव्हा ती कविता जगत असते..||
कधी श्रावणसरींसारखी ती प्रसन्नपणे बरसत असते
तर कधी ग्रीष्मातल्या उन्हासारखी प्रछन्नपणे तळपत असते ||

तिचं बरसणं काय, तिचं तळपणं काय..
सर्वांच्या सुखासाठी ती हे सारं करीत असते ||
घरातील प्रत्यक व्यक्ती मजेत आणि आनंदात जगत असते
कारण अवघ्या घरादारासाठी ती कणाकणाने झिजत असते ||

बायको म्हणजे ... बायको म्हणजे ... बायको असते
कधी समईत तेवणारी मंद दिव्याची वात, तर कधी पेटलेली मशाल असते ||
Related Posts Plugin for WordPress, Blogger...