Aug 20, 2009

दुसरं आपल्या हातात काय असतं!

महत्वाची सुचना: ही कविता माझ्या अनुभवांवर लिहिलेली नाही

बायको जेंव्हा बोलत असते...
बायको जेंव्हा बोलत असते
तेंव्हा ऐकून घ्यायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!

भडका असतो उडालेला
अनावर असतो रोष
वाभाडे काढत आपले ती
सांगत असते दोष
आपले दोष, आपल्या चुका
सारं सारं...
स्वीकारायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!

शब्दानं शब्द वाढत जातो
भडकत जातो तंटा
म्हणून वेळीच ओळखायची असते
आपण धोक्याची घंटा
समोरची तोफ बरसली तरी
आपण...
तोंड उघडायचं नसतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!

गरजून बरसून झाल्यानंतर
थकून जाते बायको
आग पाखडून झाल्यानंतर
शांतही होते बायको
अशाच वेळी विसरून सारं
तिला...
जवळ घ्यायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!

तिची चिडचिड, तिचा संताप
प्रेमच असतं हेही
तिची बडबड, तिची कडकड
प्रेमच असतं तेही
तिचं प्रेम तिनं करावं
आपलं....
आपण करायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असत?

Aug 19, 2009

या जगातील १० सत्य

या जगातील १० सत्य


1.
ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर पश्चात्ताप होतो अश्या लोकांनी सरळ दुपारीच उठावे.


२. जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे.


३. माणसाने नेहेमी स्पष्ट बोलावे म्हणजे ऐकणाऱ्यालाही स्पष्ट ऐकू जाते.


४. मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी


५. दोन जोडपी समोरा समोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या दागिने बघतात तर नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात.


६. मुलगा आणि नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे.


७. प्रेम आंधळं असतं, लग्न डोळे उघडतं.


८. देवा मला वाट पाहायची शक्ती दे... तीही आज आता ताबडतोब!


९. काही माणसे जिवंत असतात कारण खून करणे बेकायदा आहे म्हणून!


१०. काळ हा सर्वोत्तम शिक्षक आहे, पण तो आपल्या सगळ्या शिष्यांचा बळी घेतो


सुविचार


१. पैसा हेच सर्वस्व नव्हे...... मास्टर कार्ड, व्हिसा कार्डही आहेत जगात!!!


२. प्राण्यांवर प्रेम करा...... ते किती चविष्ट असतात!!!


३. पाणी वाचवा...... बीअर प्या!!!


४. शेजाऱ्यावर प्रेम करा...... पकडले जाऊ नका म्हणजे झालं