Dec 17, 2021

आठवणीतली पहिली T20 मॅच

आज आपल्यापैकी बहुतांश लोकांना जर विचारलं की पहिली T20 मॅच कोणत्या सालची आठवते, तर बहुतेकांचं उत्तर २००७ हे असेल कारण त्यावर्षी आपण पहिलाच T20 वर्ल्ड कप जिंकलो होतो. पहिली आंतरराष्ट्रीय T20 पण फार आधी नाही, म्हणजे २००४ सालीच खेळल्या गेली होती. 
माझ्या आठवणीतली पहिली T20 मात्र त्याच्याही १५ वर्ष आधीची आहे. तारीख होती १६ डिसेंबर १९८९.
तारीख लक्षात राहण्याचं कारण म्हणजे त्यादिवशी आम्ही अमरावतीला होतो कारण माझ्या काकाचं लग्न १७ डिसेंबरला (म्हणजे आजच्याच दिवशी) अंजनगावसुर्जीला होतं आणि लग्नाच्या आदल्या दिवशी आम्ही संध्याकाळी अमरावतीहून अंजनगावसुर्जीला जाणार होतो. ही मॅच झाल्यावर निघालो होतो. आणि ती मॅच लक्षात राहण्याचं कारण म्हणजे एका कोवळ्या वयाच्या लहान मुलाने पहिल्याच टूर मध्ये त्याकाळचा सर्वश्रेष्ठ लेग स्पिनर अब्दुल कादीर, ज्याची गुगली प्रसिद्ध होती, याला तुफान झोडलं होतं. त्याच्या एकाच ओव्हर मध्ये तब्बल २७ रन्स कुटून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपलं आगमन जाहीर केलं होतं. तो तारा नंतर २४ वर्ष प्रखर तेजाने तळपला. 
ती खरं तर वन-डे मॅच होती. पण त्यादिवशी गुजरानवालाला पाऊस होता. पाऊस थांबल्यावर पण उजेड कमी होता. शेवटी वन-डे मॅचसाठी आवश्यक २५-२५ ओव्हर्सची मॅचपण शक्य नसल्याने मॅच कॅन्सल झाली. पण लोकांनी तिकिटं काढली असल्यामुळे आयोजकांनी एक २० ओव्हर्सची शो-मॅच (exhibition match) घेण्याचं ठरवलं. आपली टीमपण तयार झाली कारण पुढच्या मॅचेस साठी सराव पण होईल म्हणुन.
सचिनचा तो पहिलाच दौरा होता. वय वर्षे सोळा. समोर इम्रान खान, वसिम अक्रम, वकार युनुस, अकिब जावेद असा तोफखाना. आणि वर उल्लेखल्याप्रमाणे गुगलीचा बादशाह अब्दुल कादीर. त्याची साथ द्यायला मुश्ताक अहमद, जो नंतर बरेच वर्ष एक चांगला स्पिनर म्हणुन खेळला.
पाकिस्ताननी पहिली बॅटिंग करताना २० ओव्हर्स मध्ये १५७ रन काढले. त्याकाळी इतके रन म्हणजे भरपूरच झाले, कारण तेव्हा वन-डे मध्ये पहिल्या २५ ओव्हर्स मध्ये विकेट टिकवून १०० रन्स काढले तर ५० ओव्हर्स मध्ये २३०-२४० होतील आणि मॅच जिंकता येईल असा हिशोब होता. जर २७५ वगैरे झाले तर जवळजवळ मॅच जिंकल्यासारखीच असायची.
भारत ८८ वर ३ असताना सचिन खेळायला आला. तेव्हा ४ ओव्हर्स मध्ये ६९ रन्स हवे होते आणि दुसर्‍या बाजूला होता श्रीकांत. सचिननी श्रीकांतला म्हटलं की आपण जिंकण्यासाठी खेळायला हवं आणि श्रीकांतनी अनुमोदन दिलं. सचिननी आल्याआल्याच मुश्ताक अहमदला दोन छक्के मारले आणि एक चौका. मग अब्दुल कादीर सचिनजवळ आला आणि म्हणाला की मुश्ताक तर बच्चा आहे. त्याला काय मारतो? दुसर्‍या एंडनी मी बॉलिंग करणार आहे. मला मारून दाखव. हे पण तो एका बच्चालाच म्हणाला होता, जो की नंतर त्याचा बाप ठरला. कादीरच्या पुढच्याच ओव्हर मध्ये सचिननी २, ६, ६, ६, ४, ३ असे २७ रन्स काढले. सचिन फक्त १८ बॉल्स मध्ये ५३ रन काढून नॉट-आऊट राहिला. पण ही मॅच आपण ४ रननी हरलो.
सचिननी हा किस्सा सांगताना म्हटलंय (https://www.youtube.com/watch?v=Mdh_aGDD9jo&t=344s) की कोणतीही भारत पाकिस्तान मॅच exhibition मॅच वगैरे नसते, आणि सर्व खेळाडू जीव ओतूनच खेळतात. (२०२१ T20 वर्ल्ड कपच्या मॅचचा सन्माननीय अपवाद वगळता).

 
या मॅचचा स्कोअरबोर्ड खाली दिला आहे.  


आणि या ओव्हरचा व्हिडिओ https://www.youtube.com/watch?v=0gSy7zpA5a4 या लिंकवर उपलब्ध आहे. ही इंटरनॅशनल मॅच नसल्यामुळे या मॅचचा रेकॉर्ड अधिकृत नाही. यावरून A Wednesday चा हा डायलॉग आठवतो -
ये वाकया ये केस किसीभी फाईलमें दर्ज नहीं है।
कही कोई रेकॉर्ड नहीं है।
बस जहेन में है...!!!
- संदीप पारखी