Apr 6, 2009

मराठी चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी

साचेबध्द चाकोरीतून बाहेर पडल्याने मराठी चित्रपटांना आता पुन्हा चांगले दिवस येऊ लागलेत. मराठीतही आता बिगबजेट चित्रपटांची निर्मिती होऊ लागली आहे. हिंदी चित्रपटांशी दोन हात करणा-या या चित्रपटांना चांगला प्रतिसादही मिळतोय. खरेतर अलीकडच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीला बळ देण्याचे काम नव्या दमाच्या कलाकारांनी केले आहे. निळू फुले, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यानंतर मराठी चित्रपटाला ओहोटी लागली. मात्र त्या काळात विनोदी चित्रपटांची भरमार होती. त्या चित्रपटातील गाण्यांच्या चाली कित्येक वेळा हिंदी चित्रपटातून चोरलेल्या असत. श्वाससारख्या चित्रपटांनी तग धरणा-या मराठी चित्रपटसृष्टीला भरत जाधव, पंढरीनाथ कांबळे (पॅडी), मकरंद अनासपुरे, श्रेयस तळ्पदे, सिद्धार्थ जाधव आदीं कलाकारांनी पुन्हा नवसंजीवनी मिळवून दिली. संगीत क्षेत्रात सुद्धा तरुण पिढीने भरीव योगदान दिलेले आहे. संदीप खरे, सलील कुलकर्णी, अजय-अतुल, अवधूत गुप्ते, स्वप्निल बांदोडकर, वैशाली सामंत, गुरु ठाकुर, अजित परब, हृषिकेश रानडे या तरुणांनी गीतकार, संगीतकार, गायक अशा विविध भूमिका समर्थपणे पार पाडलेल्या आहेत. ही मंडळी आजच्या स्पर्धात्मक युगात पण एकमेकांचे मित्र म्हणुन राहतात आणि एकमेकांच्या कामाची स्तुती करतात हे विशेष.

कालच "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" हा चित्रपट पाहिला. अतिशय उत्कृष्ट आहे. प्रत्येक मराठी माणसाने पाहिलाच पाहिजे असाच आहे. सर्व कलाकारांनी आपली भूमिका उत्तमरित्या पार पाडली आहे. सचिन खेडकर एका सर्व सामान्य मराठी माणसाच्या भूमिकेत आहेत. आजच्या जगात मराठी माणसाची हतबलता दूर करण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष शिवाजी महाराज (महेश मांजरेकर) मार्गदर्शन करतात. हा चित्रपट परप्रांतीयांचा तिरस्कार करण्यापेक्षा मराठी माणसाने स्वतःच कंबर कसून पुढे आले पाहिजे असा संदेश देतो.  त्यांची कामे करण्यापासून "तुम्हाला कोणी अड़विले होते काय?" असा प्रश्न शिवाजी महाराज विचारतात. चित्रपट तांत्रिकदृष्टया उत्तम आहे.


असाच अजुन एक मराठी चित्रपट "मातीच्या चूली" जो की प्रत्येक सासु-सुनेनी पाहिलाच पाहिजे. नावावरून जुनाट वाटणारा, पण प्रत्यक्षात आधुनिक काळातील एका ज्वलंत प्रश्नावर असलेला हा चित्रपट नितांतसुंदर आहे. घरातील प्रत्येक नातेसंबंध कसे असतात व कसे बिघडतात याचे सुंदर चित्रण आहे. चित्रपटा दरम्यान सुधीर जोशींच्या आकस्मिक  निधनानंतर सुद्धा "Show Must Go On" या अनुसार काही दृश्ये  सुधीर जोशी  व काही आनंद अभ्यंकर यांच्यावर चित्रित केली आहेत.

हे दोन्ही चित्रपट महेश मांजरेकर यांचे. त्यांना शतश: धन्यवाद!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...