Aug 20, 2009

दुसरं आपल्या हातात काय असतं!

महत्वाची सुचना: ही कविता माझ्या अनुभवांवर लिहिलेली नाही

बायको जेंव्हा बोलत असते...
बायको जेंव्हा बोलत असते
तेंव्हा ऐकून घ्यायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!

भडका असतो उडालेला
अनावर असतो रोष
वाभाडे काढत आपले ती
सांगत असते दोष
आपले दोष, आपल्या चुका
सारं सारं...
स्वीकारायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!

शब्दानं शब्द वाढत जातो
भडकत जातो तंटा
म्हणून वेळीच ओळखायची असते
आपण धोक्याची घंटा
समोरची तोफ बरसली तरी
आपण...
तोंड उघडायचं नसतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!

गरजून बरसून झाल्यानंतर
थकून जाते बायको
आग पाखडून झाल्यानंतर
शांतही होते बायको
अशाच वेळी विसरून सारं
तिला...
जवळ घ्यायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!

तिची चिडचिड, तिचा संताप
प्रेमच असतं हेही
तिची बडबड, तिची कडकड
प्रेमच असतं तेही
तिचं प्रेम तिनं करावं
आपलं....
आपण करायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असत?

Aug 19, 2009

या जगातील १० सत्य

या जगातील १० सत्य


1.
ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर पश्चात्ताप होतो अश्या लोकांनी सरळ दुपारीच उठावे.


२. जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे.


३. माणसाने नेहेमी स्पष्ट बोलावे म्हणजे ऐकणाऱ्यालाही स्पष्ट ऐकू जाते.


४. मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी


५. दोन जोडपी समोरा समोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या दागिने बघतात तर नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात.


६. मुलगा आणि नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे.


७. प्रेम आंधळं असतं, लग्न डोळे उघडतं.


८. देवा मला वाट पाहायची शक्ती दे... तीही आज आता ताबडतोब!


९. काही माणसे जिवंत असतात कारण खून करणे बेकायदा आहे म्हणून!


१०. काळ हा सर्वोत्तम शिक्षक आहे, पण तो आपल्या सगळ्या शिष्यांचा बळी घेतो


सुविचार


१. पैसा हेच सर्वस्व नव्हे...... मास्टर कार्ड, व्हिसा कार्डही आहेत जगात!!!


२. प्राण्यांवर प्रेम करा...... ते किती चविष्ट असतात!!!


३. पाणी वाचवा...... बीअर प्या!!!


४. शेजाऱ्यावर प्रेम करा...... पकडले जाऊ नका म्हणजे झालं


Aug 10, 2009

आम्ही मराठी आहोत कारण.........

आम्ही मराठी आहोत कारण 31st December ला दणक्यात celebration केलं तरी गुढीपाडव्याला घरावर गुढी ऊभारून जीभेवर कडू-गोड गोळी ची चव चाखत मनापासून नवीन वर्षाचं स्वागत करतो..

आम्ही मराठी आहोत कारण हॉटेल मधून येताना टाइमपास
मंचुरियन खाऊन आलो तरी वरण भात आणि साजूक तुपाशिवाय आमचे भागत नाही..

आम्ही मराठी आहोत कारण रिकी मार्टिन च्या गाण्यावर आमचे पाय थिरकले
तरी बाबूजींचे 'तोच चंद्रमा नभात' ऐकल्यावर नकळतच तोंडातून 'वाह' निघून जातं..

आम्ही मराठी आहोत कारण frnds सोबत cool outfits घालून धम्माल पार्टी केली तरी
संक्रांत दस-याला मानचा फ़ेटा आणि धोतर घालून,तितक्याच उत्साहात नातेवाईकांच्या घरी जायला आम्हाला आवडतं..

आम्ही मराठी आहोत कारण कितीही imported cosmetics- perfumes वापरले तरी
त्या typical sandal साबणा शिवाय आणि उटण्या शिवाय आमची दिवाळी साजरी होऊच शकत नाही..

आम्ही मराठी आहोत कारण वर्तमानपत्रांनी कितीही कृत्रिम रंगाविषयी लिहिलं तरी
दिवसभर मनसोक्त रंग खेळल्याशिवाय एकही होळी जात नाही..

आम्ही मराठी आहोत कारण प्रवासाला जाताना गाडीतून एखादं मंदिर दिसलं की
नकळतच आमचे हात जोडले जातात..........

Aug 2, 2009

आजोबा

 जेवताना आजोबा लाडात येत,

मला आपल्या ताटातली भाकर देत;
जेवता जेवता मधेच थांबत
आणि एक भला मोठा ढेकर देत !

मी म्हणायची रागवूनः
"आजोबा, बॅड मॅनर्स,
व्हॉट आर यू डुइंग?"
आजोबांचं हसून उत्तरः
"आय अॅम जस्ट ढेकरिंग !"

आजोबांच्या खोलीत आता
धुकं... धुकं... धुकं...
आजोबांचं जग सगळं
मुकं...मुकं...मुकं...

आजोबांना पडलं होतं भलंमोठं टक्कल !
आजोबा म्हणायचेः
"ज्याला असं टक्कल
त्यालाच असते अक्कल !"

मी खिजवून म्हणायचोः
"आजोबा, यमकासाठी
घ्या आता बक्कल !"
आजोबा मोठयाने ओरडून म्हणतः
"अरे साल्या यमक्या,
मला देतोस धमक्या?यमकांच्या धंद्यामधे
मी आहे खमक्या !"

आजोबा आपल्याच नादात
स्वतःशीच गात असत,
गाता गाता मधेच थांबून
स्वतःशीच गोड हसत !

मी जवळ गेले की
मला म्हणतः
बेटा एक लक्षात ठेवः
एकटं एकटं जाता आलं पाहिजे;
स्वतःला स्वतःशीच गाता आलं पाहिजे !"

मी गोंधळून विचारीः
"म्हणजे काय?"
आजोबा मोठयाने हसून म्हणतः
" म्हणजे काय? म्हणजे काय?
म्हणजे नाकात दोन पाय !"

"आजोबा, एक गोष्ट विचारु?"
"विचार बेटा!"
"आजोबा, तुम्हांला मैत्रिणी होत्या का हो?"
"वा! वा! होत्या म्हणजे होत्याच की !
एक ती अशी होती,
दुसरी ती तशी होती !"

इतक्यात खोलीत आजी यायची,
आजोबांची जीभ एकदम बोबडी व्हायची !
आजोबा स्वतःला सावरायचे,
चटकन विषय बदलायचे,
घसा खाकरत म्हणायचेः
"बेटा, तुला गीतेमधला
स्थितप्रज्ञ कसा असतो ठाऊक आहे?
चालतो कसा, बोलतो कसा ठाऊक आहे?"

आजोबा संध्याकळी
अंगणातल्या झाडाखाली
आपल्या आरामखुर्चीवर
एकटेंच बसत;
एकटक डोळे लावून
दूर कुठे बघत असत...
दूरदूरच्या ढगात असत,
कुठल्या तरी न दिसणा-या जगात असत !!

पाय न वाजवता मी हळूच
तिथे जाई,
त्यांच्या आरामखुर्चीमागे
उभी राही!
काय बघत असतील हे?
मी दूर पाहीः
मला वेगळं काहीसुध्दा दिसत नसे,
तीच घरं...तीच झाडं...
सगळं अगदी तसंच असे !

पाय न वाजवता मी हळूच
परत मागे घरात यायची;
आजोबांची आरामखुर्ची
सावल्यांमधे बुडून जायची !

आजोबांच्या खोलीत आता
धुकं... धुकं... धुकं...
आजोबांचं जग सगळं
मुकं...मुकं...मुकं...




- मंगेश पाडगांवकर

Related Posts Plugin for WordPress, Blogger...